श्रीराम समर्थ

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा अल्प परिचय

श्रीमहाराजांचा जन्म फेब्रुवारी १८४५ चा गोंदवल्यात, आणि त्यांनी देह ठेवला डिसेंबर १९१३ साली, गोंदवल्यातच. देहातील वास्तव्य उणेपुरे ६९ वर्षे.

आजोबा श्री लिंगोपंत विठ्ठलभक्त तर वडील श्री रावजी विरक्त. आई गीताबाई तर सर्व गावाचीच आई, सर्व गावाला मदत करणारी. अशा सात्त्विक घरी जन्म घेतल्याने लहानपणापासूनच ईश्वरभक्तीकडे ओढा होता. श्रीमहाराज वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षीच रात्री-अपरात्री नदीकाठी गुहेत निर्भयपणे ध्यानाला बसत. ८ व्या वर्षी गुरुशोधार्थ बाहेर पडले. जवळजवळ सर्व भारतभर फिरले. शेवटी वयाच्या १४ व्या वर्षी येहळेगांवचे संत तुकामाईंचा, कठोर परिक्षेनंतर अनुग्रह झाला, व तुकामाईंनी त्यांचे नाव "ब्रह्मचैतन्य" ठेवले.

आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी रामोपासना वाढवली. ’श्रीराम जयराम जयजय राम’ ह्या त्रयोदशाक्षरी मंत्राने अनेकांना अनुग्रह दिला. प्रापंचिकांना आपल्या प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करावा हे शिकविले. दीन दुबळे, दुःखी जीवांची, इतकेच नव्हे तर गाईंची सेवा केली व सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय केला.

श्रीमहाराजांना आज देह ठेऊन १०० वर्षे झाली, तरी चैतन्यरूपाने त्यांचे कार्य चालू असल्याचे जाणवते.

आईवर त्यांचे अत्यंत प्रेम होते. ते तिच्या आज्ञेबाहेर नसत. बालपणीच्या विवाहातील पत्‍नी वारल्यावर आईच्या आग्रहास्तव दुसरा विवाह वयाच्या ३३ व्या वर्षी केला. पण स्वतःहून एका अंध मुलीला स्वीकारून !

१८९१ ते १९१२ या काळांत श्रीमहाराजांनी गोंदवले, जालना, बेलधडी, हर्दा, गिरवी, मांडवी, आटपाडी, कराड, सिद्धेश्वर-कुरोली वगैरे अनेक ठिकाणी राममंदिरे स्थापिली आणि उपासना वाढवली. श्रीमहाराजांच्या जीवनांत अनेक चमत्कार घडले. पण श्रीमहाराजांनी त्याला यत्किंचितही महत्त्व दिले नाही. उलट जीवनाचे कल्याण करणारी सगुणोपासना, अन्नदान व विशेषकरून नामस्मरण याद्वारे उपासना करावी यावर भर दिला.

श्रीमहाराजांना जनप्रियत्व आवडायचे. जो निःस्वार्थी राहील त्यालाच जनप्रियत्व येईल, असे ते म्हणायचे.

’जेथे नाम तेथे माझे प्राण’ हे त्यांचे शेवटचे देहातील शब्द.