[an error occurred while processing this directive]

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

३ मार्च

प्रपंच जरूरीपुरताच करावा.


    Download mp3

पुष्कळ लोक जोडधंदा करतात; म्हणजे, त्यांचा एक मुख्य धंदा असतो, आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्यात केंद्रित झालेले असते. म्हणजे, जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरूरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफानुकसानीचा प्रसंग आला, तर जोडधंद्यातल्या नफानुकसानीकडे विशेष आस्थेने पाहात नाहीत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून, प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणार्‍या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी आळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे, त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी, पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे, त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळयांपुढे ठेवून वागावे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच सर्वस्व नव्हे.

भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरूरी आहे; पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो, आणि त्यामुळे सर्व बिघडते. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. मूल असेल तर ते कधी तरी आजारी पडायचेच. प्रपंच हा कुणाला सुटला आहे ? हा प्रपंच, हा संसार, भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल का ? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावावे; तसे करण्यात समाधान आहे. नवराबायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. जो मनुष्य हौसेने प्रपंच करील, त्याला तो करायला चोवीस तासही पुरणार नाहीत; पण जो जरूरीपुरता प्रपंच करील, त्याला तीनचार तास पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये. आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे. रामाचे नाव शक्य तितके घेऊन, आपले मन त्याच्या ठिकाणी चिकटावे यासाठी मनापासून प्रार्थना करावी.


६३. प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तिथे मोडक्या
वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त असते.