[an error occurred while processing this directive]
॥ श्रीराम समर्थ ॥श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृतअमृतघुटका
परिच्छेद २१ ते २५२१. प्रयत्नपूर्वक अभ्यासाने आत्मचिंतन साधते (आपले आपण स्मरण करावे, असे मी सांगितले यावर) तू अशी शंका घेशील की, 'मी तत्वतः परमात्मा आहे हे मान्य; पण प्रत्यक्षात मी नेहमी विषयस्मरण करीत असतो, मग स्वस्वरूपस्मरण असाध्य दिसते. ते कसे साध्य व्हावे ?' (तुझ्या या संभाव्य शंकेचे मी निरसन करतो.) तर तू थोडे लक्ष देऊन ऐक. असे पहा की कागद व शाई मुळात भिन्न वस्तू असतात. पण लेखकाने लिहिण्याचे काम केले म्हणजे शाई कागदावर उमटून दोन्ही एक होतात, अर्थ व्यक्त होतो. कागदावर आपणहून काही लेख उमटत नाही. (आता दुसरे उदाहरण सांगतो.) घरात सोने आहे पण त्यावर सोनाराने कारागिरी केली नाही, तर सोन्याची आपोआप सरी होत नाही. पण सोनाराने काम केले म्हणजे हे सोने आणि ही सरी अशा दोन भिन्न वस्तू रहात नाहीत, सोने आणि सरी एकच होतात. या दोन उदाहरणांवरून तुला असे समजून येईल की जे आधी असाध्य दिसते ते प्रयत्न केल्याने साध्य होते. म्हणून तू नामस्मरणाच्या साधनाचा अभ्यास करावास म्हणजे प्रकृति व पुरूष, जगत् व परमात्मा, विषय व आत्मा हे द्वैत नाहीसे होईल, अद्वैताचा अनुभव येईल. (म्हणजेच आपले आपण स्मरण करणे, स्वस्वरूपात लीन होणे, तुला साधेल.) २१ २२."मुख्य साधनाचे सार"
मनात वासना न बाळगता, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारी वाणींनी रामचिंतन करावे. नामस्मरण या मुख्य साधनाचे सार म्हणजे चारी वाणींनी नामस्मरण करणे. वैखरी वाणीला रामनामाव्यतिरिक्त अन्य बोलण्याने खंड पाडू नये. नामस्मरणातून मन विचलित होऊ देऊ नये. अशाच अभ्यासाने परावाणीने नामस्मरण करण्याचा पाया तयार होतो. ॥२२॥ गुरूने दिलेल्या मंत्राचा वैखरीने उच्चार, नामघोष प्रथम दररोज काही वेळ, शक्यतो ठराविक वेळेस व ठराविक स्थळी आणि अभ्यासाने, अखंड नामोच्चार करण्याने, परावाणीने नामस्मरण करण्याचा पाया तयार होतो. उंचावरून पाणी दगडावर एकसारखे ठिबकत राहिले तर पाण्याच्या थेंबांनी दगडाला खळगा पडतो, त्याप्रमाणे वैखरीच्या नामघोषाने नामस्मरण मनात खोलवर जाते व परावाणीने स्मरण करण्याची तयारी होते. गुरूने शिष्याला दिलेला मंत्र त्याच शिष्याकरिता असतो व तो शिष्याचा गुप्त ठेवा असतो, म्हणून दुसर्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने तो म्हणावयाचा नसतो. तो फक्त स्वतःलाच ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणायचा असतो. तो मोठ्याने उच्चारल्यास अधिकाराने दुसर्याला मंत्र सांगितल्याचा अपराध घडतो. गुरूने मंत्रोपदेशाचा अधिकार दिल्यावाचून शिष्याने दुसर्यास मंत्र द्यावयाचा नाही असा दंडक आहे. अन्यथा मंत्रदीक्षेचा अधिकार कोणीही आपल्याकडे घेईल व गुरूबाजीची बजबजपुरी माजेल. व्यवहारात्सुद्धा विशिष्ट कागदावर विशिष्ट पात्रतेच्या अधिकार्याचीच सही लागते. तोच न्याय येथे लागू आहे. दीक्षामंत्राखेरीज भजनमंत्र अनेक आहेत; जसे राम कृष्ण हरि, हरे राम सीताराम, जय जय श्रीराम, रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम, जय जय गुरूमहाराज गुरू, जय जय परब्रह्म सद्गुरु, इ. हे मंत्र प्रकटपणे म्हणण्यास कोणासही प्रत्यवाय नसतो. त्यांचा व्यक्तिशः किंवा समूहाने रागदारीत किंवा टाळमृदुंगाच्या गजरात घोष केला असता मन तल्लीन होते. प्रपंच चिंता व देहभान यांचा विसर पडतो आणि मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होते. वैखरीने नामघोष करण्याला अंगात शक्ती लागते, ती सर्व परिस्थितीत टिकतेच असे नाही. तसेच साधकाला व्यवहारही सांभाळावा लागतो आणि त्यासाठी त्याला इतर बोलावे लागते. व्यक्तिशः किंवा समूहाने वैखरीने नामोच्चार करण्याला अशा तर्हेच्या मर्यादा असतात. म्हणून अखंड जपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्यमा, पश्यंती व परा याही वाणींनी जप करण्याचा अभ्यास लागत असतो. ओठ व जीभ यांची हालचाल करून, म्हणजे वैखरीने नामस्मरणाला प्रारंभ करणे बहुतेकांना सोपे, सोयीचे व लाभदायक असते. पुढे सवयीने तोंड बंद असून आतल्या आत जीभ थोडी हलून नामस्मरण होऊ लागते. नामाचा अभ्यास आणखी वाढला म्हणजे नाम मध्यमेत येऊ लागते. जड व सूक्ष्म यांच्या मधली म्हणून ही 'मध्यमा' वाणी. या स्थितीत ओठ व जीभ यांची हालचाल नसते, तर वाणींचे मेंदूतले जे केंद्र तेथे नामाचे सूक्ष्म स्पंदन चालू असते. येथून या नामाला शारीरिक शक्ती आवश्यक रहात नाही, व बाह्य परिस्थितीशी संबंध कमी होऊ लागतो. शरीराच्या सामान्य हालचालींनाही बाध कमी होऊ लागतो. वैखरीने वा मध्यमेत नाम चालत असता आपण ते कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करीत रहावे, याने एकाग्रता साधण्यास फार मदत होते.अभ्यास नेटाने चालू राहिला म्हणजे नाम यानंतर पश्यंतीमध्ये हृदयस्थानी, अनुसंधानरूपाने चालते व अखेर ते नाभिस्थानी परावाणीने केवळ स्फूर्तिरूपाने चालू असते. मग बोलणे, देहाची हालचाल, स्थिती, व्याधी किंवा बाह्य परिस्थिती या कशाचाही ब्यत्यय न होता नाम अखंड चालू रहाते. म्हणून श्रीमहाराज याला 'मुख्य साधनाचे सार' असे म्हणतात. २३. वासनेपायीं जन्ममरणाच्या येरझार्या घडतात, म्हणून वासनापाश तोडावा मनुष्याच्या मनाला जखडणारी सर्व बंधने वासनामूलक असतात. त्या वासनेचे स्वरूप काय आहे हे मी बरोबर सांगतो.
(अज्ञान बालकाला सहज गंमत करण्याची वासना उत्पन्न होऊन ते पेटलेला फटाका किंवा काडी-काटकी दूर भिरकावून देते, ती गवतावर पडून आग लागते, व ती वाढत जाऊन तिला वणव्याचे स्वरूप येते; अशा रितीने सहज म्हणून) वणवा लागून (पण त्या आगीला घाबरून) लहान मूल घरी पळून येते. तिकडे वणवा भडकून त्यात मोठमोठे वृक्ष, व्याघ वगैरे पशू जळून जातात. अशा रितीने ते लहान मूल घरी राहूनही एखाद्या काडीच्या योगाने हजारो जीव व झाडेझुडपे यांच्या संहाराला कारणीभूत होते. (परिणामाच्या) अज्ञानामुळे जसा हा भयानक वणवा, तसा स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे सूक्ष्म व फोल अशा वासनांचा पुढे भडका होऊन, त्या वासनांमुळे जीवात्मा जन्ममृत्यूच्या फेर्यात सापडतो (व अनंत यातनांचा भडका भोगतो). वास्तविक आत्म्याला जन्ममरण, येणेजाणे नाही हे सत्य आहे हे जाण. ॥२३॥ २४. "रामनाम जाणा अक्षरें दोन | गुरूमुखें करावी ओळखण |" हा जन्म म्हणजे देहबुद्धीमुळे (वासनेमुळे) पडलेले दीर्घ स्वप्नच होय. यातून जागे होण्यासाठी नामस्मरण (हे साधन) करावे. असो. आता आणखी विस्ताराने सांगितले तर ग्रंथ फार वाढेल, म्हणून थोडक्यात साराचेंही सार सांगतो. 'राम' हे नाम, ही दोन अक्षरे, हेच ते सार होय. त्यांची सद्गुरुमुखाने ओळख करून घ्यावी (सद्गुरूकडून रामनामाची दीक्षा घ्यावी.)
मी एक दीन साधक, माझ्या सद्गुरुंच्या कृपेने, मी ब्रह्मचैतन्य याने हा अमृतघुटका सांगितला. आता इतके सांगूनही ह्या श्रोत्याला संशय वाटत असेल त्याने मला व इतर भाविकांना पुनः भेटण्याची तसदी न घ्यावी. (कारण असे संशय घेत बसणारा खरा मुमुक्षु व साधक नसतो.) ॥२४॥ २५. वंदनपूर्वक ग्रंथसमाप्ति
ऋषी, तत्वज्ञानी आणि भक्त असलेल्या नारद, व्यास, वाल्मिकी यांच्या चरणी, त्याचप्रमाणे विद्यमान साधुसंतांच्या चरणी वंदन करून अमृतघुटका हा ग्रंथ श्रीक्षेत्र उज्जयिनी नगरीत क्षिप्रा तीरावर समाप्त केला असे. ॥२५॥ |