[an error occurred while processing this directive]

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१२ फेब्रुवारी

नाम हे सत्स्वरूप आहे.


    Download mp3

नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे; त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे, इत्यादि बंधने त्याला असतात; पण नाम दृष्याच्या पलिकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश. वाढ आणि घट, देशकालनिमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. नाम हे सत्स्वरूप आहे. नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्तीदेखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र, आणि अधिक बंधनरहित असते.

आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू. आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टिसौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पाहा. प्रथम डोळयांमधून प्रकाशकिरणे आत गेली. बाह्य सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहात असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव, इत्यादि सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन, 'ही सृष्टीची शोभा आहे' असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी विचित्रता आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना प्रकारचे पक्षी, प्राणी, या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये 'असणेपणाचा' गुण आहे; म्हणजे, सजीव प्राणी झाला तरी तो 'आहे', आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही 'आहे'. एवढेच काय, पण आनंदालासुद्धा 'आहेपणा'चा गुण आहे. या 'असणेपणा'च्या गुणाला 'नाम' असे म्हणतात. यालाच 'ॐकार' असे म्हणतात. 'ॐकारांतून' सर्व सृष्टी उगम पावली. ॐकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. अर्थात्‌, नाम म्हणजे सत्‌ होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच, आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते.


४३. नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे, आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे.